
अमळनेर : धर्मिकतेसह सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली मंगळ ग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळ व तालुका कृषी विभाग, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ॲग्री स्टॅग जनजागृती रथाचा २१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलयांनी उद्घाटन केले.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून कार्यारंभ करण्यात आला.

शेतकरी हितार्थ मंगळ ग्रह सेवा संस्था नेहमीच शेतकरीभिमुख विविध कार्यक्रम राबवत असते.त्याचाच हा एक भाग होय. या नोंदणी कामाला चालना मिळावी, जनजागृती व्हावी व शेतकरी वर्गाला याचा फायदा मिळावा म्हणून मंगळ ग्रह संस्था आणि तालुका कृषी विभाग अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे. यात अमळनेर तालुक्यातील १५६ गावांना हा जनजागृती रथ भेट देऊन तेथील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहे.
ॲग्री स्टॅग योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची योजना आहे. ही योजना केंद्र सरकारची असून राज्याद्वारे तिची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शेतीमध्ये डिजिटल पद्धतीचा वापर वाढावा यासाठी हा प्रयत्न आहे.
या योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे सरकार राबवत असलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा होय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी व त्याच्या शेतीचा माहिती संच तयार केला जाणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना केवायसीची गरज भविष्यात राहणार नाही.
ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीएम किसान योजना आणि पीक विमा सह सर्व सहकारी योजनांचा अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीने लाभ मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्रसह देशभरात शेतकरी नोंदणी कार्यक्रमाला गती देण्यात येत आहे.
कार्यक्रमाला तालुका कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार, कृषी पर्यवेक्षक दीपक चौधरी, योगेश वंजारी, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सह सचिव दिलीप बहिरम, मंगल सेवेकरी पी. एल. मेखा, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील आदी उपस्थित होते.




