
अमळनेर : अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी २४ रोजी जवळपास १३ हजार क्विंटल मालाची आवक झाली असून बाजार समितीच्या बाहेर सुमारे दोन ते तीन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अमळनेर बाजार समितीत रोखीने पेमेंट आणि रास्त भाव देण्यात येत असल्याने परिसरातील शेतकरी आपला माल घेऊन बाजार समितीत येतात. सोमवारी शेकडो ट्रॅक्टर , टेम्पो अशा वाहनातून गावठी हरभरा , चापा हरभरा ,काबुली व्ही2 हरभरा , गुलाबी हरभरा , डॉलर सफेद हरभरा , गहू , तूर ,ज्वारी ,लाल मका , दादर ,बाजरी आदी प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी आणला जात आहे. मोठ्या प्रमाणात आवक असल्याने वाहने उभी करण्यास जागा मिळत नाही. पर्यायाने येणारी वाहने धुळे रस्त्यावर उभी करावी लागत आहेत. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. सकाळपासून दुपारपर्यंत रस्त्यावर वाहने उभी असतात. लिलाव सकाळी लवकर सुरू होत असला तरी सर्वच शेतकरी वेळेवर त्याच दिवशी घरी परतावेत म्हणून, सभापती,उपसभापती, संचालक मंडळ, व्यापारी, उशिरापर्यंत लिलाव करून बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी, हमाल , मापाडी , गुमास्ता देखील सहकार्य करतात. त्यामुळे आलेल्या सर्व मालाची विक्री करून शेतकरी रोख पेमेंट घेऊन घरी परतत आहेत.
सोमवारी सर्व प्रकारचा हरभरा ५ हजार ५०० क्विंटल , गहू ३००० क्विंटल , तूर ३०० क्विंटल , मका २००० क्विंटल तसेच इतर भरड धान्य असे एकूण जवळपास १३ हजार क्विंटल शेतमाल विक्रीसाठी आला होता.
असे होते भाव
हरभरा ६२००-९३०० रुपये प्रति क्विंटल (विविध प्रकारा प्रमाणे), गहू २३००-२७००, तूर ५५००-६७००, मका १५७५-२१८५, बाजरी २६००- २८५१, दादर २५००- ४१७०, ज्वारी २०१५-२३०० रुपये प्रति क्विंटल.




