
अमळनेर: शहरातील लक्ष्मीनगर भागात मागील दोन महिन्यांपासून तीन गल्ल्यांचे रस्ते खोदून तयार ठेवण्यात आले आहेत, मात्र अद्याप काँक्रीटीकरणाला मुहूर्त लागलेला नाही. नवीन २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असले तरी रस्त्यांचे काँक्रीटीकरण लांबणीवर पडले आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

वाहने आणि पादचाऱ्यांचे हाल
रस्ते पूर्ण खोदले गेले असल्याने वाहने चालवणे कठीण झाले आहे. विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांना चालणेही अवघड झाले आहे. काही ठिकाणी मोठे मोठे दगडं खड्या आणि धूळमुळे अपघातांचाही धोका वाढला आहे.
कचरा गाडी बंद; दुर्गंधीचा त्रास
रस्त्यांची दयनीय स्थिती पाहता कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या गाड्याही या गल्ल्यांमध्ये पोहोचू शकत नाहीत. परिणामी घरगुती कचरा रस्त्यावर साचत आहे आणि दुर्गंधी पसरत आहे.
नगरपालिकेचे दुर्लक्ष; नागरिक संतप्त
स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. काम सुरू झाल्यानंतर ते कधी पूर्ण होणार याची कोणतीही स्पष्टता नाही.
लवकर काम पूर्ण करण्याची मागणी
लक्ष्मीनगरमधील रहिवाशांनी नगरपालिकेने त्वरित रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी आशा पाटील, निशा मुसळे, सीमा वानखेडे, रत्नप्रभा ठाकूर, नूतन पाटील, पूनम सोनवणे, नीलिमा बाविस्कर, वर्षा पाटील, वनिता सिसोदे, मनीषा भदाणे, नीलम चौधरी, कल्याणी बिचवे, अनिता पाटील, सोनाली धनगर आदी महिलांनी यावेळी इशारा देण्यात आला आहे. नगरपालिका प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया..
आर. के. नगरात रस्त्याचे काम सुरू आहे. ते उद्या आटोपून लक्ष्मीनगर भागात काम सुरू करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात येतील. व लवकर काँक्रीटीकरण सुरू करण्यात येईल – डिगंबर वाघ, बांधकाम अभियंता पालिका




