
अमळनेर : काही दिवसापूर्वी पालिकेने अतिक्रमण काढलेल्या उघड्यावर आलेल्या कुटुंबापैकी धुडकु सुकलाल मराठे यांचा ३१ रोजी रात्री साडे सातला दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने अतिक्रमण धारकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी अमळनेर पालिकेने गांधीनगर येथील अतिक्रमण काढण्यात आले. अनेक कुटुंब उघड्यावर आले. पालिका अतिक्रमण धारकांना टाकरखेडा रस्त्यावर म्हाडा कॉलनीत घरे द्यायला तयार आहे आणि अतिक्रमण धारक म्हाडा मध्ये जायला तयार नाहीत. त्यांना घरे मिळालेली नाहीत असा आरोप अतिक्रमण धारकांनी केला आहे. हा वाद न्यायालयात पोहचला असून न्यायालयाने जैसे थे चे आदेश दिल्याने अतिक्रमण काढलेला मलबा तसाच पडून आहे. अतिक्रमण धारक काही कुटुंब याच ठिकाणी उघड्यावर बस्तान मांडून आहेत. उन्हात दिवस काढायचा असाच नित्यक्रम धुडकू सुकलाल मराठे (वय ७०) याचाही होता. पत्नी ,मुलगी ,नातू ,नातसून यांचे पालनपोषण बसस्थानक वर टपरी चालवून करत होते. दिवसभर ऊन चटके देत होते. गर्मी मुळे त्रास होत होता. दोन दिवसांपूर्वी धुडकू मराठे आजारी पडले. आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांचे कुटुंबीय त्यांना दवाखाण्यात नेऊ शकले नाही. तब्येत बिघडत चालली होती आजूबाजूचे लोक विचारपूस करायला आले असता धुडकू मराठे त्यांना मी येथून हलणार नाही. मेलो तरी चालेल मला याच ठिकाणी असलेल्या झाडाच्या लाकडात जाळा असे सांगत होते. आणि दगड मातीच्या ढिगाऱ्यावर असलेल्या खाटेवरच ३१ मार्च रोजी रात्री साडे सात वाजेला जीव सोडला. काही वेळातच पावसाचे आगमन झाले. निसर्गाला देखील रडू आले होते.




