
अमळनेर : शहरातील सफाई कामगारांना तब्बल दोन महिन्यांनंतर वेतन मिळाले असले, तरी अद्याप त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झालेले नाही. आयडीबीआय बँक वेतन ट्रान्सफर करण्यास विलंब करीत असल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमचंद संदानशिव यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गुढी पाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पालिकेत कार्यरत असलेल्या या सफाई कर्मचाऱ्यांना गेले दोन महिने वेतन मिळाले नव्हते. अखेर प्रशासनाने वेतन अदा केले, मात्र ते अद्याप त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झालेले नाही. यामुळे आयडीबीआय बँकेसमोर कामगारांनी ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. “आमच्या मेहनतीच्या पैशांसाठी आम्हालाच लढावे लागते, ही शोकांतिका आहे,” असे एक कर्मचारी म्हणाला.
यावेळी संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रशासन आणि बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, अद्याप निश्चित तोडगा निघालेला नाही. अनेक कामगारांचे घर चालवण्यासाठी वेतनाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे तातडीने ट्रान्सफर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया… बँक प्रशासनाकडून तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला आज ते काम होईल असे आश्वासन बँकेने दिले. आणि काम सुरू झाले आहे. मात्र, कामगार संघटनांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला त्यामुळे गैरसमजातून आंदोलन केले. – उपेंद्र बिसेन, शाखा व्यवस्थापक आयडीबीआय अमळनेर.




