
अमळनेर : शहराबाहेरील अंबर्शी टेकडीला अचानक आग लागून सुमारे २५ हजार झाडे जळून खाक झाल्याची घटना २ एप्रिल रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. सुमारे साडे तीन तास आगीचे तांडव सुरू होते. पर्यावरणाचा मोठा ऱ्हास झाला आहे. या टेकडीला समाज कंटकांमुळे आठ ते दहा वेळा आगी लागून नुकसान झाले आहे.

२ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास अचानक टेकडीला आग लागल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर याना मिळाली. त्यांनी अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी ,दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख , जफर पठाण , मच्छीन्द्र चौधरी , सत्येंन संदानशीव, आकाश संदानशीव, भिका संदानशीव ,आकाश बाविस्कर याना दोन मोठे व एक लहान बंब तसेच आरोग्य विभागाचे ट्रॅक्टर घेऊन टेकडीवर पाठवले. अग्निशमन दलाचे कर्मचारी पाण्याने आग विझवत होते तर अंबर्षी टेकडी ग्रुपचे सदस्य , महिला हाऊसिंग ट्रस्ट च्या महिला झाडाचा पाला पाचोळा आपटून वेड्यासारखे आग विझवत होते. साऱ्यांच्या प्रयत्नाने सुमारे साडे तीन तासाने आग शमवण्यात यश आले. हनुमान टेकडीकडील भागाला आधी आग लागली. त्यांनतर आग पसरत पसरत नक्षत्र वन , अमृत वन , रोटरी वन ,आयएमए वन जळून खाक झाले. ११११ गटातील काही भाग देखील जळाला. टेकडीवर सुमारे ४५ हजार झाडे लावलेली आहेत. एक प्रकारे जंगल वसले असून याठिकाणी पक्षी ,प्राणी , सरपटणारे प्राणी यांचा वावर वाढला होता. जमिनीची धूप थांबवण्यासाठी तसेच प्राण्यांना ,पक्ष्यांचे घरटे सुरक्षित राहावेत म्हणून जमीनीवरील गवत जैसे थे ठेवण्यात आले होते. या टेकडीच्या संवर्धनासाठी शहरातील अनेकांनी योगदान दिलेले आहे. टेकडी ग्रुप नियमित देखभाल करतो. ५ हजार पिंपळाची झाडे आणि इतर अशी सुमारे २५ हजार झाडे जळून टेकडीचा ५० ते ६० टक्के भाग जळाला आहे.
टेकडीवर येणारे काही दारुडे ,गांजा ,विडी सिगारेट पिणाऱ्यांमुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे.




