
२२ हेक्टर जंगल आणि दोन तीन शेतांचे नुकसान
अमळनेर : तालुक्यात जुनोने येथील वनक्षेत्राला अचानक आग लागून २२ हेक्टर जंगल आणि दोन तीन शेतांचे नुकसान झाले आहे. तब्बल चार तासानंतर अग्निशमन दल , गावकरी आणि वन कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांने आग विझवण्यात यश मिळाले.

अमळनेर तालुक्यात चार दिवसात तीन मोठया आगी लागून मोठे नुकसान झाले आहे. अंबर्षी टेकडी पाठोपाठ सात्री गावात आग लागली आणि ६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जुनोने च्या वनक्षेत्राला आग लागली. भर दुपारी आग लागली आणि वारा सुरू असल्याने जंगल भुरुभुरु जळत होते. उन्हाच्या चटक्यांमुळे आग विझवण्याचे धाडस होत नव्हते. वनविभागाने आगीची माहिती मुखायधिकारी तुषार नेरकर याना कळवताच त्यांनी तातडीने दोन अग्निशमन बंब पाठवले. मात्र जंगलात अग्निशमन बंब जाऊ शकत नसल्याने आग विझवण्यास त्रास होत होता. अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी , दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख , जफर पठाण , मच्छीन्द्र चौधरी ,आकाश संदानशिव ,आकाश बाविस्कर या कर्मचार्यांसोबत वनपाल प्रेमराज सोनवणे , वनरक्षक सुप्रिया देवरे , वनमजुर अधिकार पारधी , प्रवीण पाटील , समाधान पाटील , मयूर पाटील हे वन कर्मचारी , दगाजी पाटील यांचे टँकर आणि पोलीस पाटील उमेश महाले , पोलीस पाटील नरेंद्र पवार , युनूस पठाण , अमजद पठाण यांनी पाईपला पाईप जोडून लांबपर्यंत ओढून पाणी मारत होते काही जण मातीच्या साहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न करीत होते तर काही जण झाडांचा पाला घेऊन गवतावर मारून आग विझवत होते. आगीच्या झळा आणि वरून सूर्याची आग यात अग्निशमन दल ,वन कर्मचारी , गावकरी यांची लाही लाही होत होती. संयुक्त वन समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील त्यांना पाणी आणून आणून पाजत होते. त्यांच्या शरीरातील उष्णता कमी होऊ नये म्हणून प्रत्येकवेळी कॅन भरून पिण्याचे पाणी आणत होते. अथक प्रयत्नानंतर चार तासांनी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
वाऱ्यामुळे शेतातील आजूबाजूची ठिणगी उडून गवतावर पडल्याने आग लागली असावी किंवा कुणी बिडी सिगारेट पिऊन काडी फेकल्यानेही आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.




