
अमळनेर : तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी एक काळवीट आणि दोन हरणांचा मृत्यू झाल्याची घटना ६ रोजी घडली. तर विहिरीत पडलेल्या एका हरणाला वाचवण्यात यश आले आहे.

अमळनेर टाकरखेडा जळगाव मार्गावर शासकीय गोदामाजवळ एका अज्ञात वाहनांच्या धडकेत तीन वर्षांचे हरीण रस्त्यावरच मृत्युमुखी पडले. अपघातात हरणाचे पोट फाटल्याने तिच्या पोटातील पिल्लू बाहेर येऊन त्याचाही मृत्यू झाला होता. त्याच प्रमाणे दोधवद येथे देखील एक ८ महिन्यांचे काळवीट शेतात मृत्युमुखी पडले. तर जुनोने तेथे एक तीन महिन्याचे पिल्लू विहिरीत पडले होते. त्याठिकाणी चेतन समाधान धनगर आणि दुर्वा आनंदा धनगर या दोघा तरुणांनी विहिरीत उडी मारून त्याचे प्राण वाचवले आहेत.
वनपाल प्रेमराज सोनवणे , वनरक्षक रामदास वेलसे , वनरक्षक सुप्रिया देवरे , वनमजुर अधिकार पारधी ,प्रवीण पाटील , समाधान पाटील , मयूर पाटील यांनी जिवंत हरणावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले. तर मृत हरणांवर जंगलात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले.
कडक उन्हाळा लागल्याने पाण्याच्या शोधत हरणे वणवण भटकत असावेत. तर जुनोने शिवारात कदाचित जंगलात आग लागल्याने हरणे पळत सुटले असावीत आणि लहान पिल्लू विहिरीत पडले असावे. चार दिवसात चार हरणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन हरणे विहिरीत पडली आहेत.




