
अमळनेर:- तालुक्यातील नगाव येथील पोलिस पाटील प्रवीण गोसावी व बाम्हणे येथील पोलिस पाटील गणेश भामरे यांना नुकतेच पुणे येथे राज्यस्तरीय उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भोसरी (पुणे) येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने राज्यभरातील उत्कृष्ट पोलीस पाटलांचा भव्य सत्कार व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात प्रविण रामपुरी गोसावी, गणेश धर्मराज भामरे यांना सन 2024-25 या वर्षाचा राज्यपाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री पंकज राजेश भोयर, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे संस्थापक भिकाजीराव पाटील यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण साळुंके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, खजिनदार निळकंठ थोरात, महिला आघाडीच्या प्रमुख तृप्ती मांडेकर, तसेच राज्यभरातील पोलीस पाटील संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.




