
अमळनेर : राजकीय नेत्यांच्या हस्ते उदघाटनाच्या प्रतिक्षेत दीड दोन वर्षांपासून झाकोळलेल्या क्रांतीकारकांचे स्मारक अखेर संतप्त समाजसेवकांनी जनतेसाठी खुले केले आहे. स्वातंत्र्य संग्रामात लढा देणारे अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील डॉ उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील यांचे पुतळे धुवून त्यांना अभिवादन करण्यात आले.
अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील मूळ रहिवाशी असलेल्या या दाम्पत्याचे स्मारक ढेकू रोडवर अमळनेर च्या इतिहासाचे क्रांतीपर्व म्हणून स्मारक उभारण्यात आले आहे. मात्र राजकीय व्यक्तीच्या हस्तेच उदघाटन करण्यासाठी पुतळे झाकून ठेवण्यात आले होते. त्यांच्या तोंडाला पट्ट्या लावून क्रांतिकारकांची मुस्कटदाबी होत होती. एकप्रकारे हा त्यांचा अवमान होत असल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली या स्मारक ठिकाणी असलेल्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून झाकलेले पुतळे खुले केले. पुतळे धुवून त्यांना पुष्पहार अर्पण करून डॉ उत्तमराव पाटील आणि लिलाताई पाटील यांना अभिवादन करण्यात आले.
काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बि.के. सूर्यवंशी, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत ,राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या जमाती सेलचे अध्यक्ष शरदराव पाटील , गोकुळ बागुल,गोकुळ पाटील ,शालिग्राम पाटील. हिम्मतराव, अँड.अशोक बाविस्कर ,मोतीलाल जाधव, दीपक सोनवणे ,रोहिदास गुरुजी, जयेश म्हासरे ,डी के पाटील आदींनी हे स्मारक जनतेसाठी खुले केले.
१ मे रोजी रोजी क्रांतिवीरांगणा लीलाताई पाटील यांचा स्मृतिदिन असल्याने २६ रोजी अमळनेर ते डांगरी पदयात्रा काढण्यात येणार आहे. अमळनेर तालुक्याचा स्वाभिमान असलेल्या थोर क्रांतिकारकांचे पुतळे धूळ खात पडलेले आणि कपड्यात झाकून ठेवलेले जनतेला सहन होत नव्हते म्हणून हे स्मारक खुले करण्यात आले असल्याचे घोरपडे यांनी यावेळी सांगितले.




