
अमळनेर : कुणावरही संकट आले म्हणजे माणूस पोलीस स्टेशनचा आसरा घेतो त्याचप्रमाणे एका रातबगळ्याने उन्हाच्या संकटापासून बचावासाठी मारवड पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदाराच्या कक्षाचा आसरा घेतला.
तापमानात प्रचंड वाढ झाल्याने बाहेर चिटपाखरूही फिरायला तयार नाही. प्रचंड उष्णतेपासून बचावासाठी लोक सावली , थंड पेय , पाण्याचा सहारा घेतात. त्याचप्रमाणे पशु पक्ष्यांनाही उन्हाचे चटके असह्य झाले आहेत. एक रात बगळा उन्हापासून बचाव करण्यासाठी मारवड पोलीस स्टेशन मध्ये सरळ ठाणे अंमलदार कक्षात येऊन बसला. गारव्यामुळे त्याला बरे वाटल्याने तो हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील यांच्या संगणक , खुर्चीवर जाऊन बसला. सुनील पाटील यांनी त्याला पाणी पाजले व बाजूला बसवले. सायंकाळी ऊन कमी झाल्यावर तो पक्षी वातावरणात उडून गेला.
सध्या रात बगळ्यांची पिल्ले घरट्यातून मुक्त होण्याचा कालावधी आहे. रातबगळे अन्न शोधण्यासाठी लांब अंतरावर जातात. त्यामुळे पिल्ले मोठी झाली की घरट्यातून बाहेर वातावरणात निघतात. बाहेर कडक उन्हाळा असल्याने त्याने गारवा शोधला असावा. नागरिकांनी पशु पक्षी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि या दिवसात त्यांची घरटी मोडू नये.- अश्विन पाटील, पक्षीमित्र अमळनेर




