
अमळनेर : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचयतींचे आरक्षण काढल्यानंतर त्या ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची पुन्हा लकी ड्रॉ काढण्यात आल्याने आरक्षण समतोल बिघडला होता म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २५ रोजी उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. यात नामाप्र प्रवर्गात दोन ग्रामपंचायतींच्या आरक्षणात अदलाबदल तर सर्वसाधारण प्रवर्गात बारा ग्रामपंचायतीच्या आरक्षणात अदलाबदल झाला आहे.
३० जानेवारी २०२५ रोजी खडके , रणाईचे बुद्रुक , दहिवद खुर्द , लोण बुद्रुक , कुऱ्हे खुर्द ,दहिवद , निसर्डी , मालपूर , रणाईचे बुद्रुक , हिंगोणे बुद्रुक, तळवाडे, लोण सिम ,धार या ग्रामपंचायतींची सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती.
मात्र सोमवारी तालुक्यातील संपूर्ण ११९ ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यात आल्याने त्या १३ ग्रामपंचायतीचा पुन्हा आरक्षण सोडतीत समावेश होता. ग्रामपंचायत अधिनियम १९६० च्या कलम (४)(५)(६) प्रमाणे ही प्रक्रिया चुकीची असल्याने जिल्हाधिकारींच्या आदेशाने नगरपालिका सभागृहात उन्नती प्रदीप महाले या मुलीच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
यात गलवाडे बुद्रुक नामाप्र सर्व साधारण मधून नामाप्र महिला राखीव झाले तर रणाईचे खुर्द नामाप्र महिला होते ते नामाप्र सर्वसाधारण झाले. त्याचप्रमाणे इंदापिंप्री ,कळमसरे , कन्हेरे ,आर्डी ,बहादरवाडी ,लोणखुर्द या ग्रामपंचायतींचे सरपंच पद सर्वसाधारण महिला राखीव झाले , तर दहिवद ,निसर्डी , मालपूर , रणाईचे बुद्रुक ,वाघोदे , धानोरा या ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण महिला राखीव मधून फक्त सर्वसाधारण (जनरल) झाले.
आरक्षण सोडतीसाठी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , नायब तहसीलदार प्रशांत धमके , किशोर साळुंखे , प्रदीप महाले यांचे सहकार्य लाभले.




