
अमळनेर : पावसाळ्यापूर्वी नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत नाले सफाईला सुरुवात केली आहे. दोन जेसीबीद्वारे १८ नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे.
अमळनेर शहरात पिपऱ्या नाला ,धुळे रोड ,विप्रो नाला , पिंपळे रोड, ढेकू रोड असे एकूण १८ नाले असून त्यात आठ मोठे व दहा लहान नाले आहेत. वर्षभरात या नाल्यांमध्ये सुमारे ४०० टन गाळ साचतो. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुडुंब भरून वस्त्यांमध्ये, कॉलनीत , रस्त्यांवर घाण पाणी ओसंडून वाहते. त्याचे परिणाम दैनंदिन जीवनावर होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. ऐन पावसाळ्यात नाले सफाई करता येत नाही.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अभियंता डिगंबर वाघ , आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे , आरोग्य निरीक्षक किरण कंडारे ,आरोग्य समन्वयक गणेश गढरी , मुकादम ज्ञानेश्वर संदानशिव , श्यामराव करंदीकर , महेंद्र बिऱ्हाडे , प्रवीण बिऱ्हाडे ,योगेश पवार , सतीश बिऱ्हाडे ,भरत आगळे यांचे पथक नेमून एप्रिल महिना अखेरीपासूनच नाले सफाईची जबाबदारी देण्यात आली आहे. ढेकू रोडवर आणि आर के नगर च्या पाठीमागे नालासफाईला सुरुवात करण्यात आली. ढेकू रोड च्या नाल्यात हिरवी वनस्पती वाढल्याने पाण्याच्या प्रवाहास अडथळे निर्माण झाले होते.
प्रतिक्रिया…
पावसाळ्यात विविध कॉलन्यांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. साथीच्या आजारांची लागण होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी दीड महिना आधीच नाला सफाई करून हा गाळ भूमीभराव करण्यासाठी वापरला जाणार आहे.- तुषार नेरकर, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद