
उच्च न्यायालयाचे आदेश असूनही सात्रीच्या पर्यायी रस्त्याचे काम बंदच…
अमळनेर : उच्च न्यायालयाचे आदेश असूनही पाटचारीचे अतिक्रमण काढून सात्री गावाला पर्यायी रस्त्याचे काम सुरू होत नाही म्हणून ५ मे रोजी निम्न तापी प्रकल्पाच्या बॅक वॉटर मध्ये जलसमाधी घेण्याचा इशारा सात्री ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की सात्री गाव निम्न तापी प्रकल्पात १०० टक्के बुडीत क्षेत्रात आहे. पावसाळ्यात पूर परिस्थिती असताना सात्री गावाला पाण्याचा वेढा पडतो. चार पाच महिने गावाचा संपर्क तुटतो. रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नाही. गेल्या दोन वर्षात प्रमोद बोरसे , आरुषी भिल , उषाबाई भिल यांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. आणि मयताच्या कुटुंबियांना अद्याप पावेतो मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देखील मिळालेली नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची दुधाळ जनावरे आजारी पडल्यास त्यांचाही उपचाराभावी मृत्यू होतो. गरोदर मातांना वेळेवर लस मिळत नाही. प्रसूतीसाठी आधीच स्थलांतर व्हावे लागते. शासनाने २०२३ पासून स्पीड बोट दिलेली आहे. मात्र दोन वर्षांपासून पोहणाऱ्या स्वयंसेवकांना प्रशिक्षणही दिले नाही त्यामुळे बोट ही फक्त शोभेची वस्तू ठरली आहे.
सात्री गावाला पर्यायी रस्ता मंजूर करून विविध प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मात्र पर्यायी रस्त्याच्या शासकीय जागेवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. याबाबत उच्च न्यायालयात दिशाभूल करणारा खोटा दावा दाखल करण्यात आला होता त्यात स्थगिती मिळाली होती मात्र सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर न्यायालयाने ६ फेब्रुवारी रोजी स्थगिती उठवून रस्त्याचे काम करण्यास हरकत नाही असे आदेश दिले होते. सदर रस्त्याबाबत शासनाकडून कोणतीही दाखल घेण्यात आलेली नाही. ग्रामस्थांकडून मागणी लावून धरली असून काहींनी रस्त्याची मागणी करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सात्री वासीयांच्या जी घेण्या समस्येवर प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने अखेर ५ मे रोजी निम्न तापी प्रकल्पाच्या बॅक वॉटर मध्ये जलसमाधी घेऊ असा इशारा महेंद्र बोरसे यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी ,कार्यकारी संचालक तापी महामंडळ , अधीक्षक अभियंता , उपविभागीय अधिकारी ,कार्यकारी अभियंता तहसीलदार याना देण्यात आल्या आहेत.
निवेदनावर महेंद्र बोरसे , माजी सरपंच सुनीता पाटील ,रवींद्र पाटील ,मीराबाई बागुल , सुनील बोरसे , निर्मालाबई बोरसे , श्रीराम भिल ,पांडुरंग ठाकरे ,सचिन बोरसे,मनोहर बोरसे ,राजेंद्र ठाकरे , संदीप बागुल यांच्यासह सुमारे १५० नागरिकांच्या सह्या आहेत.




