
८ रोजी रथ मिरवणूक तर १२ रोजी पालखी मिरवणूक
अमळनेर : प्रतिपंढरपूर अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवाला अक्षय तृतीया पासून प्रारंभ होत आहे. ८ रोजी रथ मिरवणूक तर १२ रोजी पालखी मिरवणूक निघणार आहे.
३० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बोरी नदीच्या वाळवंटात हभप प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत स्तंभारोपण व समाधी मंदिरांवर ध्वजारोहण होणार आहे. ३० एप्रिल ते ७ मे दरम्यान दररोज सकाळी ९ ते १२ तुकाराम महाराज गाथा भजन होणार आहे. ३ मे ते ५ मे दरम्यान जिल्हास्तरीय भजनस्पर्धा होणार आहेत. ६ मे रोजी सखाराम महाराजांचे चवथे गादीपती हभप प्रल्हाद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हभप जयदेव बुवा गुरव यांचे कीर्तन होणार आहे. ७ रोजी सकाळी हभप मोहन महाराज बेलापूरकर यांचे व दिंडीचे आगमन होईल. रथ मिरवणुकीपासून बोरी नदीच्या वाळवंटात मोठी यात्रा भरते. विविध खाद्य पदार्थांची दुकाने , करमणुकीची साधने , पाळणे ,झोके , जायंट व्हील , फुग्यांची , घरगुती वस्तूंची दुकाने थाटलेली असतात. विद्युत रोषणाई , लायटिंग ने दुकाने सजवलेली असतात. महाराष्ट्रातून लाखो भाविक येत असतात.
८ रोजी वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीला सायंकाळी साडे सात वाजता रथोत्सव होणार आहे. वाडी चौकातून विठ्ठल मंदिरापासून रथ मिरवणूक सराफ बाजार ,दगडी दरवाजा ,फरशी रोड , पैलाड मार्गे बोरी नदीतून दुसऱ्या दिवशी सकाळी रथ जागेवर येईल. या मिरवणुकीत बागलाण तालुक्यातील आदिवासी सांस्कृतिक कला मंडळाचे विशेष आकर्षण असेल. ११ रोजी संत सखाराम महाराज पुण्यतिथी निमित्त वाडी चौकात मोफत सर्व रोग निदान शिबीर होईल.
१२ रोजी सकाळी ६ वाजता वाडी चौकातून पालखी मिरवणूक निघेल. या मिरवणुकीत भुसावळ व चाळीसगाव येथील बँड चे विशेष आकर्षण असेल. रथ मार्गाप्रमाणेच पालखीचा मार्ग असेल. १३ रोजी हभप मोहन बेलापूरकर महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्सवाची सांगता होईल. मात्र तरीही बोरी नदी पात्रातील यात्रा सुमारे १५ दिवस सुरूच राहते.
यासह मंदिर परिसरात हभप शारंगधर देशमुख बुवा यांचे वारकरी कीर्तन , अनिता पद्माकर जोशी यांचे नारदीय कीर्तन , डॉ प्रज्ञा देशपांडे पळसोदकर यांचे दासगणू महाराज परंपरेतील नारदीय कीर्तन , हभप लोटांगणे महाराज यांचे भजन , सांस्कृतिक कला निकेतन यांचे संतांचे निरूपण आणि त्यांनी रचलेल्या अभंगावर कथ्थक नृत्याचा कार्यक्रम ,राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रमाकांत भालेराव यांचा नुपूर कथ्थक नृत्याचा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम , बाल कीर्तनकार अग्रणी( तृप्ती ) हिचा कीर्तनाचा कार्यक्रम , सखा माऊली मंडळ छत्रपती संभाजी नगर यांच्या भारुड व संगीत भजनाचा कार्यक्रम होईल. हभप किसन गोळेसर यांच्या अभंगाचा , तर हभप श्रीनिवास महाराज उत्राणकर यांच्या पारंपरिक भजनाचा कार्यक्रम होईल. याव्यतिरिक्त समाधी मंदिरासमोर विविध कीर्तनाचे कार्यक्रम होतील.
नगरपालिकेने नदी पात्रात साफसफाई सुरू केली आहे. पोलिसांतर्फे चोख बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे. महावितरण तर्फे यात्रेत अडथळे निर्माण होऊन वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून नवीन फिडर टाकले जात आहे. तरी भाविकांनी सर्व कार्यक्रमांचा आणि यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन हभप प्रसाद महाराज गुरू ज्ञानेश्वर महाराज व श्री सद्गुरू संत सखाराम महाराज माऊली विठ्ठल रुख्मिणी संस्थान तर्फे करण्यात आले आहे.

