
कपाटात सापडलेली चांदीची भांडी मालकाला केली परत
अमळनेर-सोने व चांदीचे भाव गगनाला भिडत असताना दुरुस्तीसाठी आलेल्या कपाटात दीड ते पावणे दोन लाख किमतीची चांदीची भांडी सापडूनही मोहात न पडता ती संबंधित मालकाला परत केल्याने कपाट कारखानदार उपाध्ये बंधू व त्यांच्याकडील मजुराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

न्यू प्लॉट भागात व्हाईट बिल्डिंग येथे प्रशांत उपाध्ये व नितीन उपाध्ये यांच्या मालकीचा ओम सतगुरु इंटरप्रायजेस नावाचा कारखाना असून याठिकाणी अमळनेर येथील कुंभार टेक भागातील अप्पा गुरव यांनी कपाट दुरुस्तीसाठी पाठवले होते,सदर कपाटाच्या खालील लॉकर मध्ये आजोबांनी ठेवलेली त्यांची वडिलोपार्जित चांदीची भांडी असल्याची कल्पना त्यांना देखील नव्हती,आणि ही भांडी खालील लॉकर मध्ये कोपऱ्यात असल्याने कपाट खाली करताना त्यांच्या निदर्शनास आले नाही. सदर कपाट नादुरुस्त झाल्याने दोन महिने त्यांच्या घराबाहेर पडले होते,त्यानंतर दोन तीन दिवसांपूर्वी दुरुस्तीसाठी उपाध्ये बंधू यांच्याकडे आले असता त्यांच्या कडील कारागीर रामदास दगडू चौधरी यांच्या ती निदर्शनास आली,यात चांदीचे भांडे,चांदीची फोटोफ्रेम,शिक्के आदी वस्तूंचा समावेश होता. त्यानी हे वैभव पाहून देखील मोहित न होता मालक उपाध्ये बंधू यांच्या निदर्शनास आणून दिले,या बंधूनी देखील प्रामाणिकपणे लागलीच कपाट मालक श्री गुरव यांना बोलावून घेत सदर भांडी त्यांच्याकडे सुपूर्द केली,सदर प्रामाणिकपणा बद्दल त्यांनी कारागीर श्री चौधरी यांना 500 रुपये बक्षीस दिले. सदर वस्तु आर्थिक दृष्ट्या मौल्यवान असल्या तरी ते आमचे वडिलोपार्जित वैभव असल्याने याची किंमत आमच्यासाठी पैशापेक्षा मोठी असून ते आम्हाला परत मिळाल्याने याचा मोठा आनंद आम्हाला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगत मालक व कारागीर सर्वांचे विशेष आभार व्यक्त केले.
दरम्यान आमच्याकडे दुरुस्ती साठी नेहमीच जुने कपाट येत असतात बऱ्याचदा यात काहिनाकाही वस्तू आढळून येतात मात्र प्रत्येक वेळी या वस्तू आम्ही मालकाला परत केल्या असून आमची मेहनत व ग्राहकांचा विश्वास हेच आमचे खरे वैभव असल्याचे उपाध्ये बंधूनी बोलताना सांगितले.




