
अमळनेर-येथील संत सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिनी संस्थांनचा पालखी उत्सव सोहळा आज दि 12 मे रोजी वैशाख शुध्द पौर्णिमेला जल्लोषात पार पडणार आहे.

संत सखाराम महाराज यात्रा उत्सवानिमित्त पालखी उत्सव सर्वात मोठा उत्सव मानला जातो, यामुळे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते, सकाळी सहा वाजता पालखीची विधिवत पूजा होऊन वाडी संस्थानातून पालखी मिरवणुकीस सुरुवात होत असते, पालखीत सजावट केलेली व हातात धनुष्यबाण घेतलेली मूर्ती ठेवण्यात येत असते, सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागत असते तर पालखीच्या मागे प्रसाद महाराज पायी चालत भाविकांना दर्शन व प्रसाद देत असतात. वाटेत पान सुपारी निमित्त महाराज अनेकांच्या घरी भेटी देतात, मिरवणुकीसोबत निशाणाचे घोडेस्वार भालदार – चोपदार व असा मोठा लवाजमा असतो पालखीच्या पुढे शहरातील अनेक व्यायाम शाळा, लेझीम मंडळ आदींचे पथक सहभागी होऊन आपली कला सादर करत असतात तसेच काही मंडळाचे ढोल पथक व भुसावळ येथील रेल्वेचा बँड मिरवणूकीचे आकर्षण असते, याशिवाय मृदंगवादक, भजनी मंडळ यात सहभागी होत असतात.

ही पालखी म्हणजेच पंढरीची विठ्ठल रुक्माई यांची मिरवणूक म्हणून या मिरवणुकीस महत्त्व असते. या सोहळ्यानिमित्त मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत असतो तसेच वाटेत विविध सामाजिक संस्था व मंडळांच्या वतीने पाणी व खाद्यपदार्थ यांची सोय करण्यात येत असते. सराफ बाजार, फरशी पूल, पैलाड मार्गे सायंकाळी पालखी पुन्हा वाडी संस्थानात दाखल होत होईल.


