
मराठा महिला मंडळाच्यावतीने तरुण मुलींच्या मातांना मार्गदर्शन
अमळनेर: अलीकडे अमळनेर तालुक्यात काही तरुण मुलींनी स्वतःच्या इच्छेने परस्पर विवाह केल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. यामुळे पालकांमध्ये संभ्रम व चिंता निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी मराठा महिला मंडळ, अमळनेर यांच्या वतीने विशेष चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत शहरातील विविध वसाहतींमध्ये ‘कॉर्नर मिटिंग्स’ घेतल्या जात असून, आतापर्यंत दोन बैठका पार पडल्या आहेत. या चर्चासत्रांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमात महिलांना विवेकी, सुरक्षित आणि स्वयंपूर्ण निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
या चर्चासत्राचे प्रास्ताविक मराठा मंडळाच्या अध्यक्षा प्रा. शीला पाटील यांनी केले. त्यांनी समाजातील बदलती परिस्थिती, मुलींच्या निर्णयामागची मानसिकता व त्यांच्या भावनिक गरजांचे भान ठेवून योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. भारती पाटील यांनी देखील यासंदर्भात सखोल विचार मांडले. पालकांनी मुलींशी मोकळा संवाद साधावा. त्यांच्या भावना, अपेक्षा आणि अडचणी समजून घ्याव्यात. निर्णय प्रक्रियेत मुलींच्या मतांचा आदर करून त्यांना मानसिक आधार द्यावा. शारीरिक -भावनिक बदल, प्रेमसंबंध व ऑनलाइन सुरक्षिततेसंदर्भात योग्य माहिती दिली जावी. सोशल मीडियावरील फसवणूक, ब्लॅकमेलिंगपासून सावध राहण्यासाठी मुलींना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. तणाव, नैराश्याच्या काळात तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी मुलींना प्रोत्साहित करावे. बंधने लादण्याऐवजी संवाद, समजूत आणि सहकार्याची भूमिका घ्यावी. मुलींच्या शिक्षण व करिअरला पाठिंबा देऊन त्यांना स्वावलंबी बनवावे. अशी चर्चा यावेळी करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मजा पाटील यांनी केले. चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी मराठा महिला मंडळाच्या अध्यक्षा यांनी विशेष मार्गदर्शन केले. आभारप्रदर्शन सौ. सीमा सूर्यवंशी यांनी केले.
या बैठकीस तिलोत्तमा पाटील, अलका पाटील, वसुंधरा लांडगे, कांचन शहा, कृपाली पाटील,पूजा पाटील, डॉ. भारती गाला, अनिता बोरसे, भावना देसले आणि रेखा शिंदे आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.
या उपक्रमाचा उद्देश संपूर्ण अमळनेर शहरातील महिलांमध्ये सजगता व संवादाचे वातावरण निर्माण करणे असून, यापुढे इतर वसाहतींमध्येही अशाच ‘कॉर्नर मिटिंग्स’ आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.


