
मांडळ ग्रामपंचायतीने दिले सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन…
अमळनेर:- तालुक्यातील रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर वाटोळे झाले असताना ही निद्रिस्त अवस्थेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला मांडळ येथील सरपंचांनी निवेदन देऊन अमळनेर ते मांडळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करत जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.

अमळनेर ते मूडी मांडळ रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडुपाचे साम्राज्य पसरले आहे. तसेच मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने अखेर मांडळ येथील सरपंच कविता दीपक नंदवे यांनी निवेदन देत रस्ता दुरुस्तीची व रस्त्याच्या कडेला असलेली काटेरी झाडे काढण्याची ही मागणी केली आहे. सदर काटेरी झुडुपामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने किरकोळ अपघात होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याआधी ही झुडुपे काढून टाकणे गरजेचे आहे. रस्त्याची दुरावस्था कायम राहिल्यास आंदोलनाचा इशारा ही देण्यात आला आहे.





