
नागरिकांच्या अडचणी, तक्रारी स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी उपस्थितीचे आवाहन…
अमळनेर:- येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातर्फे अमळनेर येथे १९ मे रोजी ११ वाजता लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

लोकशाहीला बळकट करण्यासाठी आणि नागरिकांच्या अडचणी, तक्रारी स्थानिक पातळीवर तातडीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने, १९ मे २०२५ सोमवार रोजी सकाळी ११:०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे तालुका स्तरीय लोकशाही दिन साजरा केला जाणार आहे. या लोकशाही दिनासाठी अमळनेर तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार असून, नागरिकांना त्यांच्या अडचणी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.

नागरिकांनी आपल्या तक्रारी संबंधित पुराव्यांसह दिनांक १९ मे २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर कराव्यात. यात महसूल संबंधित अडचणी, जमीन व मालमत्ता विषयक तक्रारी, शासकीय सामाजिक योजनांची अंमलबजावणी, विविध सरकारी विभागांशी निगडित अडचणी, शासकीय सेवा व सुविधांशी संबंधित इतर समस्या मांडता येणार आहेत. या बैठकीत प्रत्येक तक्रारीवर संक्षिप्त सुनावणी घेऊन त्वरित कार्यवाही करण्यात येईल. लोकशाही दिन म्हणजे शासनाशी थेट संवाद साधण्याची संधी असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, आपल्या समस्या मांडाव्यात आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे व तहसिलदार अमळनेर यांनी केले आहे.





