
ठसे तज्ञ, श्वान पथक आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून तातडीने तपास सुरू…
अमळनेर : हज यात्रेला गेलेल्या दोन्ही भावांच्या भरवस्तीतील घरे फोडून अज्ञात चोरट्यानी रोख रकमेसह सोन्याचे दागिने ऐवज चोरून नेल्याची घटना २१ रोजी घडली.

सादिक बाबूलाल बागवान फळ विक्रेते व त्यांची पत्नी हे २० रोजी हज यात्रेला जाण्यासाठी निघाले. त्यांचे भाऊ फारुख बाबूलाल बागवान व नातेवाईक देखील त्यांना मुंबई पर्यंत सोडण्यासाठी सोबत गेले. मुलगा रिहान चा जळगाव ला पेपर असल्याने तो घराला कुलूप लावून जळगाव गेला. २२ रोजी रिहान घरी परत आला असता त्याच्या घराचे कुलुप तोडलेले दिसले. घरात जाऊन पाहिले असता घरातील सर्व सामान कपाटातील कपडे ,वस्तू अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. सादिक आणि फारुख एकाच इमारतीत राहत असल्याने वरच्या मजल्यावरच्या कपाटातील साहित्य देखील फेकण्यात आले होते. भर वस्तीत निमुळत्या गल्लीत ही घटना घडल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.

पोलिसांना ही घटना कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील , मिलिंद सोनार ,अमोल पाटील , विनोद , निलेश मोरे , जितेंद्र निकुंभे यांनी भेट देऊन पंचनामा केला. तसेच तातडीने ठसे तज्ञ व श्वान पथक बोलावण्यात आले. श्वान पथकाला चोरट्यांचा मार्ग सापडला नाही. मात्र ठसे तज्ज्ञांनी वस्तूंवरचे ठसे नमुने घेतले आहेत. घरमालकांनी रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा माल चोरीस गेल्याचे सांगितले असले तरी नेमकी कितीची चोरी झाली हे निश्चित सांगता येत नव्हते. त्यामुळे एक भाऊ मुंबईहून परत आल्यानन्तर पोलिसात फिर्याद देण्यात येणार आहे. परंतु तत्पूर्वी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघून चोरीचा तपास सुरू केला आहे.




