
अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळेजवळ चारचाकी वाहनाने राँग साईडने येऊन धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून चारचाकी चालकाविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विश्वासराव फकिरा पाटील (वय ६५ रा. वावडे हमु जळगाव) हे त्याचे मित्र दत्तात्रय बारकु पाटील यांच्यासोबत दिनांक १९ रोजी वावडे येथून जळगाव कडे जात असताना शिरसाळे ते तळवळे गावादरम्यान वळणावर राँग साईडने येऊन मारुती अल्टो (वाहन क्रमांक एमएच १९ बीयू ६४३४) गाडीने भरधाव वेगात धडक दिली. त्यामुळे मागे बसलेला दत्तात्रय पाटील हा फेकला गेला तर जबर जखमी झाल्याने फिर्यादी बेशुद्ध झाले. त्या अवस्थेत फिर्यादीला जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यावेळी चारचाकी चालक जगदीश कासार (रा. असोदा) हा गाडी अपघातस्थळी सोडून पळून गेला. अपघातात फिर्यादी विश्वासराव यांना कपाळावर, व डोळ्यांना मार लागला असून अनेक ठिकाणी टाके टाकण्यात आले आहेत. तसेच डावा हात व उजवा गुडघा फ्रॅक्चर असून छातीला ही मार लागला आहे. सदर दुखापतीस नमूद कारचालकाविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सुनील पाटील हे करीत आहेत.




