
अमळनेर:- तालुक्यातील जानवे शिवारातील शेतात विहिरीतील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायतीच्या शिपायाचा तोल गेल्याने विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. २३ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे.

दिपक बाबुलाल पाटील (वय ४५ रा. जानवे ता. अमळनेर) असे मयत शिपायाचे नाव आहे. दीपक पाटील हे जानवे ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते आणि गावातील पाणीपुरवठ्याच्या पाच विहिरींवरील मोटारी सुरू-बंद करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शनिवारी दुपारी ते गावातील विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मोटार सुरू होत नसल्याने त्यांनी पाईप हलवून ती सुरू करण्याचा प्रयत्न केला असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते विहिरीत पडले.

ग्रामस्थांनी तातडीने त्यांना विहिरीतून बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हेकॉ कैलास शिंदे पुढील तपास करत आहेत.




