
महिलांचा पदर खोचून घेतली जल व मृदा संधारणासाठी उडी
अमळनेर:- तालुक्यातील खोकरपाट गावातील शंभू महिला शेतकरी गटातील १२ महिलांनी फक्त घरकामापुरता मर्यादित न राहता शेतात उतरून जल व मृदा संधारणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘जलरागिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महिलांनी गटशेतीचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण करत जलतारा उपचारासाठी पुढाकार घेतला आहे.

अमळनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, याच भागातील महिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करत १२ शेतकऱ्यांच्या शेतीत जलतारा उपचार मंजूर करून घेतले. मंजुरीनंतर थांबून न राहता, या महिलांनी प्रत्यक्ष शेतात जलतारा उपचार यशस्वीरीत्या सुरू केले आहेत. प्रत्येक जलतारा उपचारात एका एकर क्षेत्रातील पाणी शेतातच मुरवण्याचे उद्दिष्ट असून, त्यामुळे भूजल पातळी वाढून विहिरींना भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे. परिणामी, शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची टंचाई दूर होऊन उत्पादनक्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

महिलांचे हे धाडस पाहून सुरुवातीला संकोच करणारे पुरुष सुद्धा आता त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. ही सृजनशील एकजूट गावाच्या प्रगतीचे नवे पर्व ठरते आहे.
या उपक्रमास अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, मनरेगाचे तालुका कार्यक्रम अधिकारी किशोर पाटील, ग्रामसेविका वनश्री पाटील, ग्रामरोजगार सेवक प्रेमसिंग पाटील व पाणी फाउंडेशनच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. जलरागिनींचे हे कार्य केवळ जल व मृदा संधारणापुरते मर्यादित नसून एक मॉडेल शेत तयार करण्याच्या दिशेने ठाम पावले टाकणारा प्रेरणादायी प्रवास आहे. भविष्यात आणखी जलतारा उपचार मोठ्या प्रमाणात राबवण्याचा निर्धार या महिलांनी व्यक्त केला आहे.




