
रस्त्याला लागूनच वळणावर गोण्या फेकल्याने अपघाताला आमंत्रण, धार रस्ता बनतोय डंपिंग ग्राउंड…
अमळनेर:- अमळनेर धार रस्त्यावर क्रीडा संकुलाच्या पुढे वळणावर शेकडोच्या संख्येत कडक सिमेंटच्या गोण्या फेकल्याने अपघाताला आयते आमंत्रण मिळत असून या गोण्या फेकणाऱ्यावर कारवाईची मागणी प्रवासी करीत आहेत.

शहरातील क्रीडा संकुलाच्या पुढे धार रस्त्याच्या वळणावर कचरा फेकणाऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली असून अनेकदा रस्त्याच्या कडेला मैला, बांधकामाची घाण व कचरा टाकल्याचे दिसून येते. रात्री अपरात्री हा प्रकार नेहमी घडत असतो. २६ रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी पाण्यामुळे कडक झालेल्या शेकडो सिमेंटच्या गोण्या रस्त्याच्या कडेला साइड पट्टीवर उपसल्या. बाकी गोण्या रस्त्याला लागूनच असल्याने वाहनधारकांना जपून वाहने चालवावी लागत आहेत. हळूहळू धार रस्ता डंपिंग ग्राउंड बनत चालला असून सदर गोण्या हटवण्यात येऊन गोण्या फेकणाऱ्यावर कारवाईची मागणी संतप्त प्रवासी करीत आहेत.





