
आमदारांचा वरदहस्त असलेल्या ठराविक ठेकदारांच्या मर्जीने सुरू आहेत विकासकामे…
अमळनेर:- शहरातील ठराविक भागात विकासाची मालिका सुरू आहे. तर उर्वरित शहराची मात्र भकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. खरे तर शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न आमदारांचा आशीर्वाद असलेल्या काही ठेकेदारांनी पालिकेच्या मदतीने धुळीला मिळविले असून स्वतः राहत असलेल्या परिसरात चांगल्या सुविधा तयार केल्या आहेत. हे कोणाच्या जीवावर केले आहे, हे उघड आहे. यातून मात्र शहराचा असमतोल विकास साधला जात आहे, याची जाणीव आमदार अनिल पाटील यांना व्हावी, अशी अपेक्षा नागारिकांकडून होत आहे.

अमळनेर शहरातील विविध खुल्या भूखंडात पालिकेने आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने खेळणी व मनोरंजक साहित्य, ओपन जीम, गार्डन बसवले जात आहेत. मात्र मर्जीचे ठेकेदार व माजी नगरसेवक असलेल्या भागातच विकासकामे होत असल्याने तेथील नागरिकच नगरपालिकेला टॅक्स देतात. बाकी शहारातील नागरिक काय चिचोऱ्या देतात का असा सवाल जनता विचारू लागली आहे.

विशेष म्हणजे यात आमदार अनिल पाटील यांच्या जवळचे जे ठेकेदार असून त्यांच्याच घराजवळचे खुले भूखंड विकसित केले आहेत. यात राजू पाटील या ठेकेदाराचा समावेश आहे. ते आमदार अनिल पाटील यांच्याकडे साधे कर्मचारी म्हणून काम करत होते नंतर ते ठेकेदारही झाले आहेत. त्यांनी त्यांच्या घराजवळ करोडो रुपयांचा खुला भूखंड विकसित केला आहे. गार्डनही डेव्हल्प करून ओपन जिम टाकली आहे. खेळणी टाकली आहे. यांनीच खुले भूखंड विकसित करायचे आणि करोडो रुपयांचे ठेके घेऊन कामे करण्याचे उद्योग सुरू आहेत. मात्र निवडणुकीच्या वेळी ज्यांच्या जिवावर हे करोडोचे ठेके घेतात त्या आमदार अनिल पाटील यांच्या विरोधकांना कधीही अंगावर घेत नाही. त्यांचे केवळ गोड बोलून मलिदा कमवण्याचे काम सुरू आहे. आमदार अनिल पाटील हे असे ठेकेदार पोसत आहेत काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच अश्या गोडबोल्या लोकांना जवळ ठेवून आमदार आपलेच नुकसान करून घेत आहेत. त्यात राजू पाटील हा २० वर्षापूर्वी सायकलवर व मोटरसायकवर फिरायचा पण आज त्यांनी करोडो रुपयांच्या जमिनी धुळे रस्त्यावर घेतल्या आहेत. त्यांचे शर्ट जरी झटकले तरी त्यातून करोडो रुपयांच्या जमिनी घेतल्याचे कागदपत्रे पडतील. तसाच प्रभाकर नावाचा ठेकेदार आहे, असे एक नव्हे अनेक ठेकेदारांची मोठी यादी आहे. ते कधीच विरोधकांना अंगावर घेत नाही. मात्र करोडोची कामे घ्यायाला मात्र ताईंसाहेबांकडे पुढे असतात. काय, बाकीच्या पैलाड, तांबापुरासह इतर कॉलनी अन्य ठिकाणी का विकास करीत नाही, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
नगरपालिकेची भुमिकाही संशयास्पद…
नगरपालिकेची भुमिकाही संशयास्पद आहे. चेहरे बघून आणि मोजक्या पुढाऱ्यांचे ऐकून कामे होतात काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अऩेक ठिकाणी भूखंड विकसित केले नाही, त्यामुळे त्या लोकांनी करच भरायचा नाही, असे ठरवायचे का, तसेच काॅलनी वासियांनी भूखंड विकसित करण्यासाठी आता आंदोलनच छेडावे, म्हणजे नगरपालिकेला जाग येईल, असा सूर उमटत आहे.
पुढील भागात…
आमदारांचा नातलग असलेल्या ठेकेदाराला पालिकेची मुभा, मात्र ८० फुटी रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांचे हाल…




