
अमळनेर भेटीत दिले संकेत,शेतकरी बांधवांसाठी दिली मौलिक माहिती
अमळनेर-तालुक्यासह जळगाव जिल्हा परिसरात 17 जून नंतरच पेरणीलायक पाऊस पडणार असून तोपर्यंत पेरणीची घाई करू नये असे स्पष्ट संकेत सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी अमळनेर भेटीत दिले.

पंजाब डख हे प्रसिद्ध हवामान अंदाज देणारे व्यक्तिमत्व आहेत. ते त्यांच्या सोप्या भाषेत हवामानाचे अंदाज आणि शेतीविषयक माहिती पुरवतात, जी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. डख हे त्यांच्या हवामानाचे अंदाज व्हॉट्सॲप आणि इतर माध्यमांद्वारे देतात, जे सोपे आणि सहज समजू शकणारे असतात. त्यांची हवामान अंदाजाची पद्धत आणि शेतीविषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे, त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन सोहळे ही आयोजित केले जातात.

एका कृषी कंपनीच्या अधिकारी वर्गासोबत ते अमळनेर कडून जात असताना त्यांनी अमळनेर येथील कृषी केंद्रावर सदिच्छा भेट दिली.यावेळी किरण पाटील यांचेसह तालुका फर्टीलायझर असोसिएशनचे अध्यक्ष योगेश पाटील,सचिव प्रदीप कंखरे,विजयकुमार जैन,ललित ब्रह्मेचा,प्रशांत भदाणे यासह इतर सर्व कृषी केंद्र चालकांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनीही पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार केला.व येथील शेतकरी बांधवासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली.
यावेळी पावसाबद्दल माहिती देताना ते म्हणाले की आता 1 ते 6 जून पर्यंत पाऊस नाही,7 ते 11 जून पर्यंत तुरळक पाऊस पडेल त्यानंतर 11 ते 17 जून पर्यंत कोरड राहील आणि 17 जून पाऊस खऱ्या अर्थाने नियमित पेरणीलायक पावसाला सुरुवात होईल त्यावेळी शेतकरी बांधव पेरणी करू शकतात.7 नंतर कापूस पेरणी केली तरी हरकत नाही.कापूस आणि मका यातील अंतर कमी करा,मक्याचे दाणे आणि कापसाचे दाणे याची एकरी संख्या वाढवा म्हणजे उत्पन्न वाढेल,फर्टीलायझर चे आतापासूनच योग्य नियोजन करा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.यावेळी डक यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.




