
राष्ट्रवादी शरद पवार गट निभावणार प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका
अमळनेर-तालुक्याची आमसभा झालीच पाहिजे अशी एकमुखी मागणी मासिक बैठकीत करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यापुढे प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

पक्षांतर वाटचालीत बऱ्याच जणांनी पक्षांतर केल्यानंतर राष्ट्रवादीची मासिक सभा माजी आ.डॉ.बी एस पाटील यांच्या नावीन्य हॉस्पिटलमध्ये जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी सत्ताधारी अंदाधुंद कारभार करीत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी पक्ष आंदोलनाचा पवित्रा घेईल असे ठरले.

तसेच आगामी जि. प.,प.स.व पालिका निवडणुकीत जिद्दीने व ताकदीने उतरण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केले तर माजी आ.डॉ.बी.एस.पाटील यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे असे आवाहन केले.प्रास्तविक उमेश पाटील यांनी केले.यावेळी ऍड शकील काझी,जाकीर शेख,अनंता निकम,प्रशांत निकम,शेख रफिक आदींनी मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन डी.एम.पाटील यांनी केले.सदर बैठकीत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




