
तालुक्यातील एकलहरे येथील प्रकार, मिस्तरीला ग्रामस्थांनी दिला चोप…
अमळनेर: तालुक्यातील एकलहरे येथे मिस्तरी काम करणाऱ्या तरुणाने अल्पवयीन तरुणीला पळून जाण्याचे सांगत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली मात्र हा प्रकार मुलीने आईवडिलांना सांगितल्याने सदर मिस्तरी काम करणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांनी चोप दिला असून मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ जून रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून एकलहरे गावात घराच्या बांधकामांच्या ठिकाणी मिस्तरी काम करणारा समीर अक्रम अली खान(वय २२ रा. अमळनेर) हा गल्लीतील अल्पवयीन मुलीकडून पिण्यास पाणी मागितले. त्यानंतर त्याने घरात घुसून मुलीचा हात पकडला व आपण उद्या पळून जाऊ असे तिला सांगत त्याचा मोबाईल नंबर दिला. फोन करेल तेव्हा आपण पळून जाऊ असे सांगत त्याने ही गोष्ट कोणाला सांगितल्यास मुलीला व आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. सदर मुलीने आईवडिलांना हकीकत सांगितल्याने ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्याला चोप दिल्याची माहिती असून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देखील याठिकाणी हजेरी लावली होती. सदर आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी मारवड पोलिसांत पोक्सो ऍक्टसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.





