
ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीचीही केली मागणी…
अमळनेर : ग्रामीण भागातील रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झुडुपे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून किरकोळ अपघातांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील काटेरी झुडुपे काढण्याची मागणी सर्वत्र होत आहे.

मारवड – डांगरी रस्त्याची दुरवस्था झाली असून खड्डयामुळे वाहनांची कसरत होते. आणि त्यात रस्त्यावर काटेरी झुडुपे वाढली आहेत. काही दिवसांपूर्वी काटेरी फांद्या बसच्या काचेला लागल्याने काच फुटली म्हणून बस बंद करण्यात आली. ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र आमच्याकडे निधी उपलब्ध नाही व आमची जबाबदारी नाही असे उत्तर त्या विभागाकडून देण्यात आले.

रस्त्यांवर जाताना पुढे वळण रस्ता आहे, वाहने सावकाश चालवा अशा पद्धतीचा महत्त्वाचा सूचना फलक गेल्या अनेक दिवसापासून झुडपामुळे झाकले गेले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील डांबरी रस्त्यांवर सतत अपघात होतात. धोकेदायक असलेल्या या जागेवर यापूर्वी अनेकदा अपघात झालेले आहेत. त्यात आता हे सूचना फलक झाकले गेल्याने मोठ्या छोट्या वाहनचालकांना रस्त्याच्या अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. संबंधित जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील काटेरी झुडपे काढून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
पांझरा काठावरील मांडळ ते ब्राम्हणे फाटा रस्ता काटेरी बाभळींनी वेढला आहे. पूर्णपणे आत झाकला गेला. त्यामुळे वाहनधारकांना फांद्या लागून काट्यांचे ओरखडे ओढले जात आहे हा रस्ता बांधकाम विभागाचा आहे.तर डांगरी व करणखेडा रस्त्याची देखील हीच परिस्थिती आहे. लोणमुडी रस्त्याची देखील अवस्था सारखीच आहे. यासह ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि बांधकाम खात्याच्या रस्त्यांची अवस्था अशी आहे. वाहनांना ओरखडे ओढले जातात. बस मध्ये बसलेल्या खिडकीलगत बसलेल्या लोकांच्या तोंडाला देखील फटके बसतात. त्यामुळे रस्ते झुडुपेमय झाले आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मंगरूळ ते गलवाडे रस्त्याची देखील दुरवस्था झाली असून अनेक मोठे खड्डे पडल्याने वाहनांना अपघात होऊन पाठीचे व मणक्याचे विकार प्रवासी व शेतकऱ्यांना होत आहेत. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.




