
अमळनेर:- येथील रहिवासी, प्रामाणिक व कष्टाळू स्वभावाचे लक्ष्मण रघुनाथ साळुंखे यांनी आपल्या कुटुंबाच्या अत्यंत सामान्य परिस्थितीतही मिळेल ते काम करत आपल्या कन्येचे शिक्षण थांबू दिले नाही. जीवनातील अनेक संकटांचा सामना करत, मोलमजुरी करून त्यांनी आपल्या कन्या जान्हवी लक्ष्मण साळुंखे हिचे शिक्षण सुरू ठेवले.

जान्हवी हिने कष्ट व जिद्द यांचा आधार घेत एल.एल.बी. (कायदा पदवी) ही परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. तिच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून व प्रतिष्ठित व्यक्तींकडून तिचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.

जान्हवीचे यश हे केवळ तिचे वैयक्तिक यश नसून, संकटांशी झगडणाऱ्या कुटुंबासाठी प्रेरणादायी ठरले आहे. तिच्या यशातून, कठोर परिश्रम व निर्धार यांच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.




