
अमळनेर : गेल्या पस्तीस वर्षांपासून घराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला धोकेदायक विजेचा खांब काढण्यासाठी एक कुटुंब लढत आहे. लोकशाही दिनी देखील त्यांना न्याय मिळाला नसल्याने आम्हाला कोणी न्याय देईल का म्हणून याचना करीत आहेत.

गांधलीपुरा पारधीवाडा भागात शेळ युनूस हकीम बेलदार यांच्या लहानश्या पत्र्याच्या घराच्या प्रवेशद्वारासमोरच विजेचा खांब आहे. या खांबावरून विद्युत कनेक्शन देण्यात आल्याने अनेकदा कुटुंबाला शॉक लागला आहे. वायर जळण्याच्या घटना देखील झाल्या आहेत. याच भागातील अनेक पोल हटवण्यात आले आहेत. मात्र हे कुटुंब १९९० ,१९९६ ,२०१८ ,२०२२, २०२५ असा पाठपुरावा करत आले असून लोकशाही दिनाला देखील नुकतीच तक्रार केली होती मात्र दिशाभूल करणारी चुकीचे उत्तरे देण्यात आली.

हा विद्युत खांब हटवण्यात यावा यासाठी शाहरुख शेख युसूफ , राजेंद्र दंगल पारधी , शेख अमीर ,विजय पारधी , कादिर शेख ,नारायण मांगो पारधी , अनिल राणे ,शेख मुन्ना सत्तार , राजेश पवार ,रमेश पवार ,विनोद साळुंखे , प्रकाश पवार ,अजय पारधी ,संतोष पवार ,पुनमचंद पारधी , मनोज पारधी ,भुरे खा शेर खा पठाण आदींनी देखील तक्रार केली आहे. इतक्या वर्षांपासून तक्रार करूनही या कुटुंबाला न्याय का मिळत नाही याबाबत आश्चर्य वाटत असून यामागे काही अर्थकारण आहे का याबाबत देखील शंका व्यक्त केली जात आहे.




