
कुटुंबाचा वारसच गेल्याने चेतन व हरिषच्या आईचा आक्रोश
अमळनेर:- तालुक्यातील निम येथे २ रोजी तापी नदीत दुपारी पोहायला गेले असतांना दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यात चेतन अरुण सुतार वय (९) हरीश बाळू पाटील वय(१२) अशी मृत मुलांची नावे असून चेतन अरुण सुतार ह्या मुलाचा मृतदेह काल सायंकाळी उशिरा सापडला होता. तर दुसरा हरिष बाळू पाटील याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी ३ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सापडला होता. हरिषवर ३ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोघेही कुटुंबातील वंशाचा दिवा विझला…
चेतन सुतार व हरिष पाटील हे दोघेही घरात एकटे असल्याने आमचा वंशाचा दिवाच गेला आता आम्ही कसे जगायचे असा आक्रोश चेतन व हरिष च्या आईंचा पाहून यावेळी उपस्थितांचे मन हेलावले होते. दोघे कुटुंबांची परिस्थिती अगदी जेमतेम असून त्यातच चेतन सुतार याचे वडील चेतन तीन वर्षाचा असतानाच आजारपणात वारले आहेत. घरात आजोबा, आई मोल मजुरी करतात. तर हरिषचे आई-वडील हे पण मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करून उपजिविका चालवत होते. काल गावात विवाह सोहळा असल्याने तिकडेच असतील या विचारात होते.
दरम्यान दोघेही मुले खेळायला गेले असतील यामुळे सायंकाळपर्यंत घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता चेतन सुतार हा पाण्यात तरंगताना दिसला. दोघांनी पोहण्यासाठी गेले असताना काठावर कपडे काढून पोहत असताना ही घटना घडली.
चेतन चे वडील वारल्यानंतर चेतनची विधवा आई, लहान बहीण,वृद्ध आजी, आजोबा चेतनच्या सहवासाने जगत असताना आयुष्यातील आधारवडच गेला, आता कुणाकडे पाहून जगावे. हरिष आणि चेतन दोघेही कुटुंबातील एकुलते एक मुले नकळत निघून गेल्याने नीम गावासह परिसर या घटनेने सुन्न झाला आहे. या घटनेमुळे नीम गावात चूल पेटली नसून कोवळे शाळकरी मुलांच्या या अपघाती निधनाने प्रत्येकाला अश्रू अनावर झाले होते.




