
अमळनेर:- शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने वयोवृद्ध शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ३ रोजी सकाळी १०:३० वाजता उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाडसे येथील भाईदास उत्तम गव्हाणे (वय ६५) हे ३ जून रोजी सकाळी शेतात गेले होते. त्यांचा पुतण्या अरुण गव्हाणे याला १०:३० वाजता ते शेतातील विहिरीजवळ उभे असताना दिसले. मात्र पाच मिनिटांनी ते न दिसल्याने त्यांचा पुतण्याला शंका आल्याने त्याने विहिरीत उडी मारून पाहिले मात्र पाणी खोल असल्याने भाईदास हे दिसून आले नाहीत. तेव्हा अरुण याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवून मोटार चालू करून पाणी उपसले असता भाईदास उत्तम गव्हाणे हे दिसून आल्याने त्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण हे करीत आहेत.





