
अमळनेर : शॉर्ट सर्किटने आग लागून सहाशे फळांची झाडे आणि शेतीसाहित्य जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील झाडी येथे दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

ईश्वर शेखनाथ पाटील रा गुलमोहर कॉलनी अमळनेर यांची तालुक्यातील झाडी येथील गट नम्बर २७९/ १ शेतील पोखरा योजनेत फळझाडे लावलेली आहेत. ९ रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास त्यांचा चुलत भाऊ रतीलाल पाटील याने फोन लावून आग लागल्याचे कळवले. त्यांनी डायल ११२ ला कळवल्याने पोलीस आणि अग्निशमन दल घटनस्थळी पोहचले. प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथील सीताफळाची १५० झाडे , आंब्याची ३०० झाडे , पेरूची १५० झाडे , ठिबक नळ्या जळून खाक झाले होते. शेतातील विजेच्या तारा गेलेल्या भागात तारांच्या खालच्या भागात आग लागलेली होती. वादळ सुरू होते. त्यामुळे आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला. गावकरी आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग विझवली होती. मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.





