
बनावट शेतकरी दाखले बनवणारे मोठे रॅकेट असल्याच्या संशयाला मिळाले बळ…
अमळनेर : गेल्या तीन वर्षांपासून खोटे सातबारा जोडून शेती खरेदी केल्याची तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. तरी खरेदी रद्द करून शेतजमीन ताब्यात घेण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील मिलिंद भिकन पाटील यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. बनावट शेतकरी दाखले बनवणारे मोठे रॅकेट असल्याच्या संशयाला बळ मिळाले आहे.

काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील व्यापारी ,धनदांडगे आणि नम्बर दोनचे व्यवसायिक यांच्याकडून महसूल कर्मचारी , सेतू चालक यांना हाताशी धरून बनावट शेतकरी दाखल्यांच्या माध्यमातून शेती खरेदी केली असल्याची बाब निदर्शनास आली होती. उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत गेल्या वर्षभरापूर्वीपासून झालेल्या सर्व प्रकरणाची चौकशी करून झालेल्या सर्व खरेदी नोंदी रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तलाठी मंडळअधिकारी यांनी कुळ कायदा कलम ८४ (क) प्रमाणे तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठविल्यास ती खरेदी रद्द करून जमीन शासनाच्या ताब्यात घेण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत.

मंगरूळ येथील मिलिंद भिकन पाटील हा तक्रारदार पुढे आला असून त्याने तीन वर्षांपूर्वी पुराव्यासह केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा सुरू केला आहे. प्रशासनाने त्याच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याने त्याने ९ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून त्यात कलाबाई परशुराम वैदू यांनी ३ जुलै २०२० रोजी बनावट व खोटा सातबारा दाखवून स्वतःला शेतकरी दाखवले आणि अशोक भाऊराव पाटील यांच्याकडून शेतजमीन खरेदी केली होती. याबाबत मिलिंद पाटील यांनी ३१ जानेवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी ,उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे योग्य त्या कागदपत्रांसह लेखी तक्रार केली होती. मात्र अडीच तीन वर्षे उलटूनही दखल घेण्यात आलेली नाही.
कलाबाई वैदू यांनी पारोळा तालुक्यातील गुलाब शंकर पाटील यांचा गट क्रमांक २६८/२ हा स्वतःच्या नावे दाखवून तो बनावट सातबारा जोडल्याने त्यांनी शासनाची , जनतेची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा , सदर जमीन शासनाच्या ताब्यात घेण्यात यावी , या प्रकरणाची स्वतंत्र अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच तीन वर्षांपासून दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार कर्मचारी व अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान बनावट शेतकरी दाखले तसेच बनावट शेत मजुरांचे दाखलेही मोठ्या प्रमाणात देऊन त्या आधारावर अनेक बोगस खरेदी झालेल्या आहेत. हा खूप मोठा घोटाळा असून यात लाखोंचे गैरव्यवहार झाल्याचेही समजते. त्यामुळे या घोटाळ्याची स्वतंत्र सखोल चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी होत आहे.




