
बारा तासात दोन्ही चोर पकडून मुद्देमाल हस्तगत
अमळनेर : शहरातील मुंदडा हायस्कूल जवळ असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील किराणा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी तब्बल २४ हजारांचा किराणा माल व इतर साहित्य लंपास केल्याची घटना ११ रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलिसांनी दोन आरोपीना अटक करून त्यांच्याजवळून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

उमीदाराम मोतीराम चौधरी यांचे मुंदडा हायस्कूल जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापारी संकुलात किराण्याचे दुकान आहे.१० रोजी रात्री १० वाजता त्यांनी आपले किराणा कुलूप लाऊन बंद केले मात्र ११ रोजी सकाळी ६ वाजता त्यांना दुकानाशेजारील रहिवाशी असलेल्या नागरिकांनी फोन करून दुकान उघडे असल्याची माहिती दिली.चौधरी लागलीच दुकानाजवळ आले असता त्यांच्या दुकानाचे शटर अज्ञातानी फोडल्याचे दिसून आले.दुकानातील ८ हजार किमतीचे सोया रिफाइन तेलाचे ४ डब्बे,२ हजार ४० रुपयांचे तेलाचे ३ कॅन,६ हजार ४०० रुपयांचे तांदुळाच्या ४ गोण्या,२ हजार २५० रुपयांचे चहा पावडर,५ हजार किमतीचा मोबाईल फोन,५०० रुपये रोख असा एकूण २४ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

उमीदाराम चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गोपनीय माहितीच्या आधारे चोरी वैभव दिनेश गलांडे वय २३ रा. वड चौक, अमळनेर व अविनाश अशोक बिऱ्हाडे वय २६ रा. तांबेपुरा या दोघांनी केल्याचे निष्पन्न केले. त्यांनी पो.उप.नि. नामदेव बोरकर पो.कॉ. अमोल पाटील ,पो.कॉ. गणेश पाटील ,पो.कॉ. जितेंद्र निकुंभे ,पो.कॉ. उज्वल मस्के ,पो.कॉ. प्रशांत पाटील याना आरोपी पकडण्यासाठी पाठवले असता दोघं आरोपी पाचकंदील चौकात फिरत असताना पथकाने त्यांना पकडून त्यांच्या घरातून चोरीचा माल जप्त केला आहे.




