
डीबीटी खाते नसल्याने तांत्रिक अडचणी
अमळनेर : इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना तसेच इतर लाभार्थी योजनांचे पैसे जमा होत नसल्याने वृद्ध नागरिकांना हाल अपेष्टा सहन करत ताटकळत रहावे लागत आहे. प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबवले जात असतांना तहसील मधील गर्दी कमी झालेली नाही

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डिबिटी पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.डिसेंबर २०२४ पासून ही पद्धती सुरू झाली आहे.मात्र ज्या लाभार्थ्यांनी केवायसी केले आहे त्याच लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत आहे.ज्यांचे ई केवायसी रखडलेले आहे त्यांना याचा लाभ मिळणे बंद झाले आहे, हेच केवायसी करण्यासाठी तहसील कार्यालयात झुंबड उडत आहे. तसेच अनेक लाभार्थ्यांनी तीन चार बँकेचे खाते उघडून ठेवले आहेत. आणि स्वतःचे खाते डीबीटी न केल्याने त्यांचे लाभ खात्यावर जमा होत नाहीत आणि नागरिक तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत.

एकाबाजूला शासन आपल्या दारी,महाराजस्व या सारखे अभियान राबवून देखील सर्वसामान्य जनतेला तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. नागरिकांना हयातीचे दाखले देण्यासाठी देखील तहसील कार्यालयात यावे लागते. मात्र हीच खातरजमा ग्राम महसूल अधिकारी , पोलीस पाटील , ग्रामसेवक यांच्यामार्फत झाली तर त्रास कमी होईल. नागरिकाना बँकेत जाऊन डीबीटी करण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र प्रकरण टाकताना सेतू चालक अथवा कर्मचाऱ्यांनी वेळीच सर्व मार्गदर्शन केले तर नागरिकांचे हाल होणार नाहीत.
तालुक्यातील ज्या मंडळात शिबिर घेण्याचे राहिले आहेत तेथील नागरिकांची तहसील कार्यालयात गर्दी होत आहे.लवकरच आपल्या भागात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे लाभार्थ्यांना सांगण्यात आले आहे.-रुपेशकुमार सुराणा तहसीलदार,अमळनेर

