
पिंगळवाडे येथील २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…
अमळनेर:- तालुक्यातील पिंगळवाडे येथील २८ वर्षीय तरुणाचा पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १३ रोजी घडली आहे.

तालुक्यातील पिंगळवाडे येथील सचिन मनोहर पाटील (वय २८) हा १३ रोजी ४:३० वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्याने नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेला. मात्र मोटर सुरू करताच विजेचा झटका लागून तो फेकला गेला. त्याचा आवाज आल्याने आजूबाजूचे लोकांनी पाहिले असता तो जमिनीवर पडलेला होता व डाव्या हातात मोटरची वायर होती. लोकांनी विजेचा प्रवाह बंद करत त्याला उचलून खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मयत सचिन हा कृषी उत्पादनांच्या मार्केटिंगचे काम करायचा. त्याचे आईवडील शेती करत असून कर्ता तरुण पोरगा गमावल्याने त्यांनी मोठा आक्रोश केला. मनमोकळ्या स्वभावाच्या सचिनच्या अकाली जाण्याने गावपरीसरात हळहळ व्यक्त होत आहे. साहेबराव निंबा पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुनील पाटील हे करीत आहेत.




