
तालुक्यातील नद्या होतायेत कोरड्या आणि अनेकांचे तोंड ओले…
अमळनेर:- तालुक्यातील सर्वच नद्यांतून वाळूची खुलेआम तस्करी सुरू असून त्यावर प्रशासकीय यंत्रणा मुग गिळून गप्प बसल्याने प्रशासनाचे मौनच सर्व कहाणी सांगून जात आहे. त्यामुळे नद्या कोरड्या तर अनेकांची तोंडे ओली होत आहेत.

सध्या तालुक्यातील तापी, पांझरा व बोरी या तीन ही नद्यांतून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. तीनही नदीचे वस्त्रहरण करण्यात वाळू माफियांसह प्रशासन, पुढारी व त्यांच्या चेल्या चपाट्यांचा ही हातभार लागत आहे. तालुक्यातील शहापूर व तांदळी गावाच्या मध्यभागी असलेल्या पळावद फाट्याने पांझरा नदीपात्रात जेसीबी उतरवून ट्रॅक्टर व डंपर द्वारे रोज रात्री वाळू वाहतूक सुरू आहे. ही वाळू तांदळीपासून थेट चौबारीपर्यंत रात्रीतून पोहचवली जाते. तसेच मांडळ गावाजवळील कंचनपूर पुलाजवळ पांझरा नदीपात्रातून वाळू उचलून वाळू माफिया रात्रभर हैदोस घालत असतात. हिंगोणे शिवारातील बोरी नदीपात्रातून ट्रॅक्टर व टेम्पोने शहरात वाळू वाहून नेली जात आहे. तसेच बोरी नदीजवळ शेतात काही ठिकाणी वाळूचे ठिय्ये करून ठेवले आहेत. जळोद शिवारात तापी नदीतून तर खुलेआम जेसीबी उतरवून डंपर व ट्रॅक्टरने वाळूची लूट केली जात आहे. मात्र रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत फिरणारी ही वाहने प्रशासनातील कोणत्याही डोळ्याला दिसत नसून अधिकारी व पुढाऱ्यांच्या मूक संमतीने ही वाळू लुबाडली जात आहे. अनेकांचे खिसे यामुळे भरले जात असले तरी शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. विशेष म्हणजे पत्रकारांनी माहिती देऊन ही कारवाई होत नाही. काल रविवार सुट्टीचा दिवस म्हणून निर्धास्त झालेले वाळूमाफिया भरदिवसा वावडे परिसरातून वाळू वाहण्याचे पुण्यकर्म करीत होते. मुजोर झालेल्या या वाळू माफियांना मुर्दाड प्रशासनाचेच अभय असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले असून यांना आवार घालणारे कोणी नाही का ? असा सवाल नागरिक विचारु लागले आहेत.




