
महिलेने दाखवलेल्या हिमतीची व सारबेटे खु. येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या माणुसकीची सर्वत्र प्रशंसा
अमळनेर:- मध्यरात्री अचानक उद्भवलेल्या प्रसुतीकळा सोसत एक किलोमीटर चालत आलेल्या महिलेची गावातील महिलांच्या मदतीनेच एका घराच्या ओट्यावर प्रसूती करण्यात येऊन तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून सदर महिला व मुलीवर ढेकू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती सुखरूप असून ऐन मध्यरात्री धावून येत मदत करणाऱ्या महिला भगिनी व गावकऱ्यांनी दाखवलेली माणुसकी पंचक्रोशीत कौतुकाचा विषय बनली आहे.

सारबेटे तांडा येथील संजना शांताराम राठोड (वय ३०) ह्या महिलेची प्रसूतीची तारीख जुलै महिन्यातील होती. तिचा नवरा ड्रायव्हर असल्याची माहिती असून तो कामानिमित्त घरी नसल्याने महिला आपल्या तीन मुलींसह राहत होती. दिनांक २३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास तिला वेळेआधीच प्रसूती वेदना सुरू झाल्या. रात्रीच्या वेळी नवरा घरी नसताना धाडसी निर्णय घेत ढेकू प्राथमिक आरोग्य केंद्र जाण्यासाठी सारबेटे खु येथील खाजगी वाहन मालक विशाल ब्रह्मे यांच्याकडे तीन मुलींना घेऊन पायी चालत पोहचली. सारबेटे तांडा येथील घर ते सारबेटे बु. येथील ब्रह्मे यांच्या घरातील सुमारे १ किलोमीटरचे अंतर आपल्या तीन मुली आणि बॅग घेऊन पार केले. सारबेटे येथे पोहचल्यावर १२:३० वाजता संजनाला प्रसूत वेदना जास्त सुरू झाल्या. १०८ला फोन केल्यावर वेळ जात असल्याने विशाल ब्रह्मे यांनी एखाद्याला बोलवून ढेकू येथे जाण्याची तयारी सुरू केली मात्र प्रसूतीची वेळ जवळ आल्याने गावातील माता भगिनी धावून आल्या. गावातील विद्या विशाल ब्रह्मे, सुईन हिराबाई वंजारी, खटूबाई ब्रह्मे, नंदाबाई बनसोडे, वैजयंता ब्रह्मे , सरला ब्रह्मे , आशासेविका कामिनी ब्रह्मे, शांताबाई ब्रम्हे यासह महिला भगिनींनी यावेळी धाव घेत मदत केल्याने ओट्यावरच संजना हिची यशस्वी प्रसूती झाली व तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर विशाल ब्रह्मे, ज्ञानेश्वर ब्रह्मे, अनिकेत ब्रह्मे, उपसरपंच राजेश पाटील व ग्रामपंचायत सदस्य देशमुख वंजारी, अनिल पाटील, भावलाल ब्रम्हे आदींनी सदर महिला व बाळाला प्राथमिक आरोग्य केंद्र ढेकू येथे नेले. त्याठिकाणी नर्सेस व आशा यांनी साफसफाई करून योग्य उपचार सुरू करण्यात आले. दोघांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संजना राठोड या महिलेने दाखवलेल्या हिमतीची व सारबेटे खु. येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या माणुसकीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
प्रतिक्रिया…
सदर महिलेची प्रसुतीची तारीख जुलै महिन्यातील होती. मात्र अचानक ही परिस्थिती उद्भवली. प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका विषारी औषध प्राशन केलेल्या रुग्णाला घेऊन ग्रामीण रुग्णालयात गेल्याने रुग्णवाहिका त्याठिकाणी पोहचू शकली नाही. यावेळी ग्रामस्थांनी केलेले सहकार्य खूप मोलाचे ठरले. – डॉ. केतन पाटील, वैद्यकीय अधिकारी – प्राथमिक आरोग्य केंद्र ढेकू




