
मृतदेह गोणीत बांधून सुमठाणे शिवारातील फेकले…
अमळनेर : पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात एका ४५ वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना २५ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

जानवे सुमठाणे शिवारात एका गोणीत कोणाला तरी बांधून फेकले असल्याची माहिती अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे , अमोल पाटील , गणेश पाटील , प्रशांत पाटील , उज्वलकुमार म्हस्के , सागर साळुंखे आदि पोलिसांना पाठवले असता पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात जंगलात एका ४५ वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड टाकून तिचा खून केला आणि तिला खतांच्या गोणीत बांधून फेकून दिले होते. पुरावा मिळू नये म्हणून त्या गोणीवर पाला पाचोळा झाकलेला होता. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अमळनेर पोलिसांनी रात्री पारोळा पोलिसांना ही माहिती देऊन प्रेत त्यांच्या ताब्यात दिले. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.




