
अमळनेर – शहरातील रामनगर भागात पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली असून साचलेल्या पाण्यामुळे रस्ता पूर्ण चिखलमय झाला आहे काल विद्यार्थ्यांना नेणारी स्कूलची व्हॅन यामध्ये फसल्याची घटना घडली.

सकाळच्या शाळेच्या वेळेत व्हॅन अडकल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागला. याच भागातून रोज शेकडो मोटरसायकलस्वार ये-जा करतात, मात्र रस्त्यावरील चिखलामुळे अनेकजण घसरून पडत आहेत.
तथापि, स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही निगरगठ्ठ पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. पावसाळा सुरु असतानाही मूलभूत रस्त्यांची डागडुजी न होणे, ही गंभीर बाब मानली जात आहे. यासंबंधी मुख्याधिकारी नेरकर यांना सांगून ही समस्या कायम असल्याने स्थानिक नागरिक आणि पालकवर्गांनी संताप व्यक्त केला आहे. पालिका प्रशासनाने किमान मुरुम टाकण्याची तरी तसदी घ्यावी, अशी अपेक्षा या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.




