
अमळनेर:- तापी नदीकाठी निम व कलाली येथे पुरातन काळापासून निवास करणाऱ्या ग्रामस्थांनी अध्यात्मिक साधनेसाठी प्राणप्रतिष्ठा केलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सालाबादप्रमाणे प्रमाणे यावर्षी ही आषाढी एकादशी निमित्त दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित केले असून विविध गावातून येणाऱ्या पालख्या दिंडीसाठी भजन, कीर्तन,हरिपाठ, भारूड महाप्रसाद असा नित्याचा कार्यक्रम होणार आहे, आषाढी एकादशी निमित्त मंदिर परिसरात रंग रंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई तयार करण्यात आली आहे.

दोन्ही गावातील मंदिरात विराजमान विठ्ठल रुक्मिणी मुर्त्यांची प्रांतसमयी पांच्यामृत व सप्त नद्याच्या पाण्याने अभिषेक करून उपस्थित भाविकातून पांच जोडप्याच्या हस्ते महापूजा व काकडा आरती होईल आणि सकाळी 6 वाजता महाआरती होईल, सकाळ पासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येणाऱ्या पालख्या व दिंडीचे श्रीफळ पुष्पवृष्टी करून स्वागत मंदिर समितीकडून करण्यात येईल, एकादशी उपवासाचे महत्व व विष्णूचा अवतार समजल्या जाणाऱ्या विठ्ठलाची महती ख्याती यावर दुपारी कपिलेश्वर मठाचे मठाधीपती महामंडलेश्वर हंसानंद तीर्थ महाराज निम येथे उपस्थित भाविकांना प्रवचनातून ज्ञानदान करणार आहेत, सकाळी 10 वाजता उपवाससाठी तयार करण्यात आलेल्या महाप्रसादाचा भोग व नैवेद्य दाखवून भाविकांनी महाप्रसाद वाटप करण्यात येईल तरी या पवित्र व महाएकादशी निमित्त आयोजित कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन निम व कलाली येथील विठ्ठल मंदिर संस्थान व ग्रामस्थांनी केले आहे




