
अमळनेर:- शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा मेळा भरवित विठ्ठल नामाचा गजर करीत परिसरात काढलेली आषाढी दिंडी सोहळा लक्षवेधी ठरला.
विठ्ठल व रुक्मिणीच्या पेहरावातील विद्यार्थी साक्षात विठू रुखमाईची प्रचिती देत परिसरात ”विठ्ठल विठ्ठल ‘ नामाचा गजर करीत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन नववारी साडी घातलेल्या विद्यार्थिनी रांगेने चालत होत्या तर पांढरे कपडे घातलेले वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थी टाळ वाजवीत माऊली माऊली करीत वातावरण विठूमय करीत होते. सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या आवारातून विद्यार्थ्यांनी दिंडीला सुरुवात केली. मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी दिंडीचा शुभारंभ केला.सदर दिंडी शंकर नगर परिसर ,पिंपळे रोड परिसरातून सरस्वती विद्या मंदिर येथे समारोपप्रसंगी शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी विठ्ठल गीतांवर टाळ वाजवीत यथेच्छ नृत्य केले.यावेळी शिक्षिका सौ संगिता पाटील,सौ.गीतांजली पाटील,सौ.पूनम पाटील उपशिक्षक ऋषिकेश महाळपूरकर, धर्मा धनगर आदींनी दिंडीत सहभाग घेतला.श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष समाधान शेलार यांनी याप्रसंगी उपस्थिती लावली.




