
नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते “सर्वोत्तम सेवा पदक” प्रदान…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील रहिवासी व नागपूर येथे कार्यरत असलेले अप्पर आयकर आयुक्त संदीपकुमार रतन साळुंखे यांना “सर्वोत्तम सेवा पदक” प्रदान करण्यात आले.
तालुक्याच्या मातीतून घडलेले आणि आज देशाच्या आर्थिक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारे तालुक्याचे सुपुत्र संदीपकुमार साळुंखे, यांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते हे “सर्वोत्तम सेवा पदक” प्रदान करण्यात आले. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 24 जुलै रोजी, म्हणजेच आयकर दिनाचे औचित्य साधून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी संपूर्ण देशातून केवळ १० निवडक अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्यात श्री साळुंखे यांची निवड होणे हे केवळ अमळनेरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाची आणि प्रेरणादायक बाब आहे.
श्री साळुंखे यांनी आयकर खात्यातील पारदर्शक आणि कार्यक्षम कार्यपद्धतीद्वारे अनेक नवकल्पना राबवून प्रशासनात उत्कृष्ट सेवा मूल्यांचे उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये जलद आणि निष्पक्ष निर्णय घेण्यात आले असून, त्यांनी आर्थिक शिस्त व उत्तरदायित्व यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
या राष्ट्रीय गौरवामुळे अमळनेरच्या भूमीवर सन्मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल समस्त अमळनेर परिवारातर्फे संदीपकुमार साळुंखे यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. हे यश नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
रूट चळवळीच्या माध्यमातून राबवला ग्रामीण विकासाचा अनोखा पॅटर्न…
रूट चळवळीअंतर्गत मारवड व परिसर विकास मंचच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जलसंधारणाची कामे करण्यात आली. त्यामुळे भूजलपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन अनेक शेतकऱ्यांना फायदा झाल्याने तालुक्यातील अनेक गावात विकासमंच स्थापन करण्यात येऊन जलसंधारणाच्या कामाद्वारे अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत झाली. गावागावातील तरुणाई विधायक कामासाठी सरसावल्याचे चित्र या चळवळीमुळे पाहायला मिळाले. हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान श्री. संदीपकुमार साळुंखे व त्यांच्या रूट या संकल्पनेचा केलेला गौरवच असल्याचे मत तालुक्याभरातून व्यक्त होत आहे.




