
ऐनवेळी तक्रारदाराने साक्ष न दिल्याने फौजदारी कारवाई टळली…
अमळनेर : युरियाच्या जादा दराने नियमबाह्य विक्रीप्रकरणी अमळनेर शहरातील दोन दुकानांवर भरारी पथकांद्वारे भेट देऊन तपासणी करण्यात आली. यावेळी कृषी केंद्र चालकाकडून गैरकारभार सुरू असल्याचे निदर्शनास आले मात्र ऐनवेळी तक्रारदाराने साक्ष न दिल्याने फौजदारी कारवाई टळली आहे.
अमळनेर तालुक्यातील दोन कृषी निविष्ठा विक्रेत्यांविरुद्ध जिल्हा स्तरीय भरारी पथका कडुन युरिया खताच्या जास्त दराने विक्रीबाबत कारवाई करण्यात आली. एल.एम.कवाड या खत विक्री केंद्रावर भरारी पथकाने तक्रारदार व साक्षीदाराकडुन युरीया वाढीव दराने विक्रीचा पुर्ण व्हिडीओ मोबाईल मध्ये छायाचित्रीत करण्यात आला आहे. दुसरे साईकृष्णा फर्टिलायझरची तपासणी केली असता तेथेही युरियाचा साठ्यात अनियमितता आढळली. वाढीव दराने युरिया विक्रीच्या प्रकरणात प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी तक्रार दिली होती. यानुसार, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होताच ऐनवेळी तक्रारदार यांनी जबाबावर स्वाक्षरी करण्यास नकार देऊन, फौजदारी कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न केले. या कारवाईबाबत पोलिसांना माहिती कळवली होती. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे, कारवाईनंतर तक्रारदार व साक्षीदार अचानक गायब झाले. त्यानंतर पुढील चौकशीसाठी जबाब देण्यासही त्यांनी नकार दिला. या प्रकारामुळे जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत याबाबत पोलिसांना अवगत केले आहे . संपूर्ण कारवाई जिल्हास्तरीय भरारी पथकांचे प्रमुख पद्मनाभ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विकास बोरसे व तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अविनाश खैरनार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
प्रतिक्रिया…
खत विक्रेत्यांच्याकडुन अनावधानाने झालेल्या चुकांचा आधार घेऊन,कृषी विभागाकडे तक्रार करणे व ऐनवेळी चौकशीत सहकार्य न करता तक्रार मागे घेणे हे अत्यंत चुकीचे असुन, शासनाची दिशाभूल करणारे कृत्य असल्याचे समजण्यात येईल. – पद्मनाभ म्हस्के, जिल्हा कृषी विकास अधिकारी




