
अमळनेर: तालुक्यातील मंगरूळ ते पिंपळे रस्त्याची दुरावस्था झाली असून नवीन झालेल्या रस्त्यावर लगेच खड्डे पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मंगरुळ ते पिंपळे रस्त्याचे काम अपूर्ण असून काम सुरूच असतानाच नवीन रस्त्यावरच खड्डे पडले आहे. तसेच ठेकेदाराने साइड पट्ट्या भरल्या नाहीत त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच काम बाकी असलेल्या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. दुचाकीस्वारांसह मोठ्या वाहनधारकांना खड्डे टाळताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक किरकोळ अपघात याठिकाणी घडले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला समज देऊन गुणवत्तापूर्ण काम करून घ्यावे अशी मागणी होत आहे. दरम्यान रस्त्याचे काम अपूर्ण असून ठेकदाराकडून दुरुस्ती करून घेतली जाईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे भागवत माळी यांनी सांगितले आहे.
प्रतिक्रिया…
रस्ता बनवायला दीड महिना ते दोन महिने होत नाही तेवढ्यातच मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे – युवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते पिंपळे




