
अनिल संदानशीव याचा विचित्र जबाब, पोलिसांनी वैद्यकीय चाचणी करून सत्य शोधण्याचा घेतला निर्णय
अमळनेर : मी शारीरिक संबंध करण्यास सक्षम नसल्याने महिला मला नपुंसक म्हणून हिणवत होत्या म्हणून मी रागात त्यांचा खून केला असा विचित्र जबाब अनिल संदानशीव याने पोलिसांना दिला आहे. पोलिसांनी आरोपीवर विश्वास न ठेवता वैद्यकीय चाचणी करून सत्य शोधण्याचा निर्णय घेतला आहे.
सुमठाणे आणि जानवे जंगलात शोभाबाई कोळी आणि वैजंताबेन भोई यांचा खून तसेच शहनाजबी हिच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या आरोपीने नेमका हा प्रकार का केला असावा याबाबत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम सखोल चौकशी करत आहेत.
अनिल हा सिरीयल किलर आहे का ? त्याचा काही महिलांशी संपर्क आढळून आला आहे. पोलिसांनी त्याचे दोन वर्षाचे सिडीआर मागवले आहेत. अनिल पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून महिलांकडून पैसे उकळतो आणि फसवतो. त्यांनी पैशांचा तगादा लावला की त्यांचा खून करून त्यांना संपवतो अशीही चर्चा पसरली होती. विविध कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंगल तपासले तसेच आरोपीला देखील जंगलात नेऊन विचारपूस केली. त्याला महिलांवरील हल्ल्याचे कारण विचारले असता त्याने मी महिलांशी शारीरिक संबंध करण्यास सक्षम नसल्याने त्या मला नपुंसक म्हणून हिणवतात म्हणून रागाच्या भरात मी त्यांना मारले असे विचित्र सांगितल्याने पोलिसांना हे कारण संयुक्तिक वाटले नाही. कारण त्याने दोन महिलांशी शारीरिक संबंध केल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे. म्हणून त्याची वैद्यकीय चाचणी करून सत्य शोधले जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक निकम यांनी दिली.

