
ठिकठिकाणी हल्ले होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
अमळनेर– शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले व वृद्धांवर या कुत्र्यांनी आक्रमक रूप धारण केल्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांत कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः सकाळी शाळेत जाणारी मुले आणि सायंकाळी कामावरून घरी परतणारे नागरिक यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.आठ दिवसा पूर्वी गलवाडे रोडवर शुक्लाजी नमकीन यांच्या घराजवळ
लहान मुले खेळत असताना पांच ते सहा कुत्रे मिळुन लहान मुलांना घेरले,सुदैवाने लक्ष गेल्यावर इतर लोकांनी धावत जाऊन त्या कुत्र्यांना पळवून लावल्याने ती मुले बचावली.
तसेच दाजिबा नगर मध्ये देखील असाच प्रकार घडला
.कॉलनी परिसरात देखील कुत्र्यांनी अचानक सहा ते सात नागरिकांवर हल्ला चढवला. विशेष बाब म्हणजे यामध्ये काही लहान मुलेही किरकोळ जखमी झाली आहेत.खायला मिळत नसल्याने याचा परिणाम भटक्या कुत्र्यांवर झाला असून, नेहमी दुकानांजवळ मिळणारे अन्न बंद झाल्याने ते उपाशी राहून आक्रमक झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
बाहेर गावातून अमळनेर मध्ये कुत्रे आणून सोडले जातात यामुळेच संख्या वाढत असल्याची चर्चा असून अमळनेर नगरपरिषदेने याबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर आहे.तरी “नगर परिषदेने या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिकांनी केली आहे.
शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
कुत्र्यांचा उपद्रव विशेषतः शाळकरी मुलांसाठी धोकादायक ठरत असून, काही पालकांनी आपल्या मुलांना एकटे शाळेत पाठवणेही टाळले आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत कुत्र्यांची संख्याही अधिक असते, त्यामुळे पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.




